लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांची शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. त्याचवेळी महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रमुख कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दुसऱ्यांदा आंदोलन पुकारल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत.
ब्रिजभूषण यांना काही दिवसांपूर्वीच चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा नवी दिल्लीत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आवश्यकता भासल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. दोन्ही वेळा त्यांनी स्वत:वरील आरोपांचे खंडन करताना आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
साहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही चौकशी करण्यात आली असून, त्यांना काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून, यामध्ये महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी अल्पवयीन मुलीने दंडाधिकाऱ्यासमोर साक्ष दिली असून, ती कलम १६४ अनुसार नोंदवून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या देखरेख समितीच्या अहवालाचा आधार घेत दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदविल्याचे वृत्त आहे.
