अभियांत्रिकी प्रवेशासाठी ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल होणार की कायम राहणार ? याचा निर्णय उच्च न्यायालय बुधवारी देणार आहे. करोना काळात हा नियम शिथील करण्यात आला होता.
सरकारने हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता ही विद्यार्थ्यांची अडचण समजण्यासारखी आहे. परंतु ही परीक्षा महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. त्यामुळे त्यात हस्तक्षेप केल्याने होणाऱ्या परिणामांचा विचारही करावा लागेल, अशी टिप्पणी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निकाल राखून ठेवताना केली.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करण्याच्या मागणीसाठी वकील अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी ही याचिका केली आहे. प्रवेशाच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) १५ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.
तथापि, हा निकष २०१७ पासून अंमलात आहे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर शिथिल करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकार आणि एनटीएने मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी केला. तसेच निकष पूर्ववत करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहीत असल्याचा दावाही केला.
सरकारने हा निर्णय आधी घ्यायला हवा होता हे याचिकाकर्त्यांचे म्हणणे समजू शकते. परंतु ही परीक्षा एका राज्यापुरती मर्यादित नाही. देशभरातील विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाचे काय परिणाम होतील याचा विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले. करोनामुळे गेली दोन वर्षे ७५ टक्के पात्रता निकष लागू करण्यात आला नव्हता. मात्र या वर्षीपासून तो लागू केला जात आहे. परिणामी गेल्यावर्षी पात्र ठरलेले विद्यार्थी यावर्षी पात्र ठरू शकणार नाहीत. या उलट या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील वर्षासाठी पात्र ठरतील, असे याचिकाकर्तीने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची न्यायालयाने दखल घेतली. तसेच या विद्यार्थ्यांना कोणत्या कारणास्तव पात्रतेच्या निकषातून सूट द्यायची ? असा प्रश्न विचारला. हा निकष २०१७-१८ या वर्षी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लागू होता. त्यावेळी या निकषाला कोणीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आता कशाच्या आधारे विद्यार्थ्यांना या निकषातून सूट द्यायची ? या आपल्या प्रश्नाचा न्यायालयाने पुनरूच्चार केला. तसेच पात्रता निकष पूर्ववत करण्याबाबतची अधिसूचना डिसेंबर महिन्यात काढण्यात आल्याकडे लक्ष वेधले.
