पोटच्या पोराच्या अकाली मृत्यूचं दुःख सहन न झाल्यामुळे दिल्लीतील माता-पित्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. आठ वर्षांच्या मुलाचा डेंग्युमळे मृत्यू झाल्यामुळे दुःखी दाम्पत्याने घराच्या गच्चीतून उडी मारुन आत्महत्या केली आहे.
दक्षिण दिल्लीच्या लाडो सराय भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मीचंद आणि बबिता हे दाम्पत्य दोन महिन्यांपूर्वीच 8 वर्षांचा मुलगा बिट्टूसह राहायला आले होते. बबिता या गृहिणी होत्या, तर लक्ष्मीचंद एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.
बिट्टूला डेंग्यूचं निदान :
बिट्टूची तब्येत 4-5 दिवसांपासून बरी नव्हती. अखेर तापाने फणफणलेल्या बिट्टूला घेऊन त्यांनी दोन-चार हॉस्पिटलच्या फेऱ्या घातल्या. अखेर एका रुग्णालयात त्याला दाखल करुन घेण्यात आलं, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला डेंग्यू झाल्याचं निदान केलं, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
बिट्टूच्या निधनामुळे आई शोकाकुल :
उपचारादरम्यान बिट्टूचं निधन झाल्यानंतर दोघांनीही आपल्या मुलाचे अंत्यविधी उरकले. मात्र बबिता यांना शोक अनावर झाला होता. त्यांनी सतत लेकाकडे जाण्याचा धोशा लावला होता. फुलचंद यांनी पत्नीची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचं मन मानण्यास तयार नव्हतं.
‘त्या’ रात्री माता-पित्याचा टोकाचा निर्णय :
एका रात्री बबिता आणि फुलचंद फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. मात्र बराच काळ ते परत न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध केली. तेव्हा जवळच्या एका शाळेजवळ दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.
डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घराच्या गच्चीतून उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली होती. दोघांनी आपले हात दुपट्ट्याने बांधून घेतले होते.
सुसाईड नोट :
मी आणि माझी पत्नी आमच्या मुलाच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्यामुळे आत्महत्या करत आहोत.
अजित, माझा लॅपटॉप माझ्या कंपनीला परत दे
घरमालकांना विनंती आहे की त्यांनी आमचं सर्व सामान आमचे शेजारी देवाशीषच्या मदतीने ओडिसातील आमच्या घरी पाठवावं. माझे भाऊ तिथे राहतात.
विकी, माझा मोबाईल, बाईक, लॅपटॉप, एलआयसी पॉलिसी, गोल्ड लोन आणि बँक अकाऊण्टची कागदपत्रं तुझ्याजवळ ठेव

