येथील जांभळीनाका भागातील फळ-भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून परिसरातील बेकायदा फेरिवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला फळे व भाजीपाला सेवाभावी संस्थांना वाटप करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे येथील जांभळीनाका परिसरात मोठी भाजी मंडई आहे. याठिकाणी शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ आणि जिजामाता फळ-भाजी विक्रेता सेवा संघ अशा दोन व्यापारी संघटना आहेत. या संघटनांनी अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करत बेमुदत बंद पुकारला होता. पाच दिवसानंतर पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांनंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतला होता. व्यापाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार पालिका प्रशासनाने येथील बेकायदा फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. गेला आठवडाभर सकाळी ६.३० वाजल्यापासून ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात सुभाष पथ येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत भाजी बाजारावर कारवाई करण्यात येत आहे. यात फळे आणि भाजीपाला जप्त करण्यात आला आहे. हा फळ-भाजीपाला सेवाभावी संस्थांना वाटप करण्यात आला. त्यात छत्रपती शिवाजी कळवा रुग्णालय येथील शिव प्रेरणा मंडळ, वर्तक नगर येथील दिव्यप्रभा महिला अनाथालय, माँ निकेतन महिला कामगार संस्था, नौपाडा येथील वुमेन्स वेल्फेअर फाऊंडेशन, नौपाडा कोपरी प्रभागातील बेघर संस्था, येउर येथील श्री सदगुरू सेवा मंदिर ट्रस्ट या सेवाभावी संस्थांचा समावेश आहे.
