खडी, वाळूचे दर दुप्पट; मक्तेदारीमुळे पुरवठादार अस्वस्थ, कामे मंदावल्याने प्रकल्पांनाही झळ

मुंबई महानगर प्रदेशातील खडी आणि दगडमिश्रित वाळूपुरवठय़ावर एकछत्री अंमल निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे दगडखाणचालकांसह लहान-मोठय़ा पुरवठादारांमध्ये अस्वस्थता आहे. खाणचालकांकडून यापूर्वी टनामागे ३०० ते ४०० रुपयांना मिळणाऱ्या खडी, वाळूचे दर राजकीय वरदहस्त लाभलेल्या कंपनीने थेट दुप्पट केल्याने पुरवठादारांनी माल खरेदी करणेच थांबवले आहे. परिणामी, खडीपुरवठा थांबून मुंबई महानगर क्षेत्रातील विकासकामे मंदावली आहेत.

 पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील कामांसाठी लागणारी खडी ठरावीक पुरवठादारांकडूनच घ्यावी यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केला.  नवी मुंबईतील दगडखाणी बंद असल्याने कुंडे, वहाळ या रायगड जिल्ह्यातील दगडखाणींमधून मुंबई महानगर पट्टयास लागणाऱ्या वाळू आणि खडीचा जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पुरवठा होत असतो. या भागातील दगडखाण मालकांवर दबाव आणत खडीपुरवठय़ाची एकछत्री यंत्रणा उभी केली जात असल्याच्या तक्रारी पुरवठादार करत आहेत. दगडखाणमालकांकडून थेट खरेदीचा पर्याय असतानाही ठरावीक कंपनीकडेच ते म्हणतील त्या दराने खडी, वाळूसाठी आर्जव करावे लागत आहेत. अस्वस्थ पुरवठादारांनी स्थानिक राजकीय नेत्यांकडेही गाऱ्हाणे मांडल्याचे बोलले जाते, परंतु या सर्व यंत्रणेस वरच्या पातळीवरून आशीर्वाद असल्याच्या चर्चेने गेली अनेक वर्षे दगडखाण उद्योगावर वरचष्मा राखणारे स्थानिक नेत्यांनीही मौन बाळगले आहे.

 रायगड पट्टयातील दगडखाण कंपन्यांनी एका ठरावीक कंपनीसोबत माल विक्रीचा करार करण्यास सुरुवात केल्याने दराचे यापूर्वीची गणितेही बदलली आहेत. हा करार करताना दगडखाणमालकांना एका क्रशर मशीनमागे २० लाख रुपयांची अनामत रक्कम दिली जात आहे. याशिवाय खडीसाठी टनामागे ३२५ रुपये ( यापूर्वीचा बाजारभाव ३०० रुपये असा होता) आणि वाळूसाठी ४२५ रुपये ( यापूर्वी ४०० रुपये) देण्याचे करारही केले जात आहेत. हा करार केल्यानंतर दगडखाणमालकांना पुरवठादारांना थेट माल विकता येणार नाही अशी अट घातली जात आहे. यामुळे मुंबईतील विकासकामांना खडी, वाळूचा नियमित पुरवठा करणाऱ्या लहान ठेकेदारांचे मात्र कंबरडे मोडले आहे. खाणमालकांकडून ३२५ ते ४२५ रुपयांना खडी, वाळू विकत घ्यायची आणि पुरवठादारांना तीच ६६० ते ७६० रुपये टन या भावाने विकायची असे प्रकार सुरू झाले आहेत. हा एकछत्री अंमल भविष्यात आपल्याच व्यवसायावर गदा आणणारा असू शकतो हे लक्षात आल्याने यापैकी अनेकांनी हरकत नोंदविण्याचा प्रयत्न केलाही, मात्र त्यांना वरच्या ‘साहेबांचा’ धाक दाखवून गप्प केले जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *