मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खानपानासाठी पाच कोटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ वर्षां ’ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ सागर ’ या निवासस्थानी खानपान सेवा पुरविण्यासाठी खासगी केटर्सना दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी वार्षिक पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चहाचा दर १८ रुपये कप आणि कॉफीचा मात्र १३ रुपये इतका ठरवून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खानपान सेवेसाठी वार्षिक साडेतीन कोटी रुपये तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. खानपान सेवेवरील खर्च कमी करायचा नसल्यास गरजेनुसार या निधीत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खानपान सेवेवर उधळपट्टी करण्यात आली असून चार महिन्यात दोन कोटी ६८ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा मुद्दा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. तेव्हा आपल्या निवासस्थानी अभ्यागतांची गर्दी असते, त्यांना साधा चहा वा पिण्याचे पाणीही द्यायचे नाही का, असा सवाल शिंदे यांनी केला होता. खानपान सेवेसाठी राज्य सरकारने निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खानपान सेवा पुरविण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट ‘श्री सुखसागर हॉस्पिटिलिटी केटर्स’ना देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे कंत्राट छत्रधारी केटर्सना देण्यात आले आहे. खाद्यपदार्थाचे दर हॉटेलपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून उपमा,पोहे, शिऱ्याचा दर २६ रुपये तर बटाटावडा २७ रुपये प्लेट दराने पुरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *