राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी ५६९ नवे रुग्ण सापडले. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ८७४ झाली आहे. तर, दोन बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यातील एक रुग्ण मुंबईतील आहे.राज्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ४६ हजार ८७० झाली’ तसेच बुधवारी दोन बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४५१ झाली.
राज्यात बुधवारी ४८५ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण ७९ लाख ९४ हजार ५४५ करोना बाधित रुग्ण बरे झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के झाले. सध्या राज्यात ३ हजार ३२४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ कोटी ६६ लाख ६४ हजार ३८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ४६ हजार ८७० (०९.४० टक्के) रुग्ण आढळले आहेत.
राज्यात ‘एच ३ एन २’ चे पाच नवे रुग्ण
राज्यात ‘एच३ एन२’च्या पाच नव्या रुग्णांची नोंद बुधवारी झाली. त्यामुळे ‘एच३ एन२’ च्या रुग्णांची संख्या ३८४ झाली आहे. तसेच सध्या विविध रुग्णालयात ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फल्युएंझाचे ३ लाख ७० हजार ९५५० संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यात ‘एच १ एन१’ चे ४७२ तर ‘एच३ एन२’चे ३८४ रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत एका बाधिताचा मृत्यू
मुंबईतील चेंबूर परिसरात बुधवारी एका ६९ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीला मूत्रिपड आणि हृदयविकाराच्या त्रासासह उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांनी लसीची एकही मात्रा घेतली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. चेंबूरमध्ये करोनाने मृत्यू झालेल्या या व्यक्तीमुळे मुंबईतील करोना मृत्यूंची संख्या १९ हजार ७४८ वर पोहोचली आहे. मुंबईत २२१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५७ हजार ९६८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईत ११ लाख ३६ हजार ९७६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या १ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
