मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर अन् झटपट; ट्राफिक सिग्नलमध्ये होणार मोठे बदल…

मुंबईतील सिग्नल यंत्रणा अद्ययावत आणि स्वयंचलित होणार आहे. ३९५ सिग्नल स्वयंचलित करण्यासाठी आयआयटी मुंबईची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. येत्या जूनपर्यंत अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरणार आहे.

सध्याची यंत्रणा सुमारे १५ वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शहरात अनेक बदल झाले, ज्यात रहदारीचे प्रमाण वाढणे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळेच सिग्नल यंत्रणा स्वयंचालित करण्यास सुरुवात झाली आहे.सध्याच्या पारंपारीक सिग्नल पद्धतीत त्याचा कालावधी निश्‍चित केलेला असतो. म्हणजे लाल दिवा किती वेळ राहील, हिरवा दिवा किती वेळ राहील हे निश्‍चित असते. स्वयंचालित सिग्नलिंग पद्धतीने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येनुसार कालावधी ठरवतो. त्यात सिग्नलचा जास्तीत जास्त कालावधी निश्‍चित केलेला असतो.

स्वयंचालित सिग्नल असतील तर वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरू शकेल. त्यामुळे ज्या बाजूला वाहनांची संख्या जास्त आहे त्या बाजूला सिग्नल जास्त काळ सुरू राहून कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

सध्या ६५२ पैकी २५८ सिग्नल स्वयंचालित पद्धतीने कार्यरत आहेत. उर्वरित ३९५ सिग्नल टप्प्याटप्याने स्वयंचालित यंत्रणेवर कार्यरत करण्यासाठी आयआयटी मुंबईची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली. त्याचा अभ्यास सुरू असून जून २०२३पर्यंत अहवाल येणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या सिग्नल जंक्शनवरील वर्दळीच्या वेळी कोणत्या बाजूला किती वाहने असतात, वेग मर्यादा, अवजड वाहने इत्यादीचा अभ्यास केला जाणार आहे.

मुंबईत सध्याच्या घडीला ४३ लाख वाहने धावतात. फेब्रुवारी २०२०मध्ये ३८ लाख वाहने होती. त्यानंतर आणखी पाच लाख वाहनांची भर पडली. दिवसाला शेकडो नवीन वाहनांची नोंदणी मुंबईतील आरटीओत होत आहे. त्यातच ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, मीरा रोड भाईंदर, पालघर यासह अन्य भागांतूनही मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहने येतात. परिणामी वाहतूककोंडी, प्रदूषण सगळेच प्रश्न उभे राहतात. स्वयंचलित सिग्नलमुळे जंक्शनवरील प्रवास झटपट होण्यास मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *