काळबादेवी येथील एका व्यापाऱ्याची तोतया विक्रीकर अधिकाऱ्यांनी ३२ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणाची चौकशी एलटी मार्ग पोलिसांनी करून गुन्हा नोंद केल्यानंतर काही तासांच्या आत आरोपी संजयसिंग करचोली आणि रजिया शेख या दोघा तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काळबादेवी रस्ता येथील तक्रारदार जठाराम प्रजापती हे बाबूलाल प्रजापी या अंगडीयाकडे पैसे, तसेच कपड्याचे पार्सल देणे-घेण्याचे काम करतात. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जठाराम हे विष्णू कांती अंगडीया यांच्याकडून बाबूलाल यांचे व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन पायी येत असताना आदर्श हाॅटेलजवळ, काळबादेवी रस्ता येथे एक अनोळखी व्यक्ती आणि महिलेने ते विक्रीकर अधिकारी असल्याचे सांगून ३२ लाख रुपये आणि १५ हजारांचा मोबाइल फसवणूक करून घेऊन गेले. त्यानंतर, जठाराम यांंनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला.
एलटी मार्ग पोलिसांनी गुन्ह्यातील घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातून सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले. त्यानंतर आरोपीने वापरलेल्या दुचाकीचा माग काढून माहितीदारांच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधले. पोलिसांनी मंगलदास मार्केट परिसरात शोध घेऊन आरोपी संजयसिंग करचोली याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची साथीदार रजिया शेख हिलादेखील ताब्यात घेतल्यानंतर तिनेही गुन्ह्याची कबुली दिली. संजयसिंग हा मुळचा मध्यप्रदेशमधील असून मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. घाटकोपर येथे राहणारी रजिया शेखदेखील सुरक्षा रक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
