येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात, हळद खरीददार नसल्याने गेल्या दहा दिवसांपासून हळद खरेदी बंद होती. बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांची बैठक घेतली. चर्चेअंती आज शुक्रवारी हळद खरेदी सुरू झाली. हळदीला पाच हजार ६५० ते सहा हजार ४५५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हळदीला कमी भाव मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील शेतकऱ्यांनी केलेला खर्चसुद्धा निघाला नसल्याचे मत व्यक्त केले.
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात मराठवाडय़ासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून हळद विक्रीला येते. हळदीसाठी हिंगोली जिल्हा सर्व दूर ओळखला जातो. यापूर्वी हळदीला सात हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. काही दिवस हा भाव स्थिर राहिल्याने आगामी काळात भाव वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचा माल गोदामात किंवा आपल्या सोयीप्रमाणे घरी ठेवला. आता शेतकऱ्याच्या घरी नवीन हळद येण्याची वेळ आली आहे. परंतु हळदीचे भाव वाढून मिळाल्यापेक्षा कमी होत गेले आणि शेतकरी अडचणीत आला. गेल्या दहा दिवसांपूर्वी हळद खरेदीदार व्यापारी नसल्याने हळदीचे भाव पडले. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने गेले दहा दिवस हळद खरेदी बंद ठेवली. हळद उत्पादक शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरल्याने बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांची बैठक घेतली व हळद मार्केट २४ फेब्रुवारीला सुरू करण्याचे ठरले.
