इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीत गेल्या महिन्यात भीषण आग लागली होती. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या आगीला जबाबदार कोण, याबाबत अनेक खलबते झाली. अखेर घोटी पोलिस ठाण्यात या आगप्रकरणी कंपनीचे बिझनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जानेवारी २०२३ रोजी इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत आग लागली होती. या भीषण आगीत महिमाकुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर मिश्रा हे तीन कामगार मृत्युमुखी पडले होते, तर २२ कामगार जखमी झाले होते. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच पोलिस प्रशासनाकडूनही या घटनेची चौकशी सुरू होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह घोटी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर या आगीची चौकशी करीत आहेत.
आगीच्या घटनेनंतर अनेक कामगार बेपत्ता असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे शासनाकडून हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत घोटी पोलीस स्टेशनला एक जण बेपत्ता आसल्याची नोंद करण्यात आली होती. मृतदेह आढळून आलेल्या कामगाराची ओळख पटली आहे. हा परप्रांतीय कामगार आहे. सुधीर मिश्रा (वय-३४ ) असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ मीनल मिश्रा याने सांगितले. कोणीच सहकार्य केलं नाही. कंपनीनेही नाही आणि जिल्हा प्रशासनानेही नाही. तहसीलदारांशी फोनवर बोललो. पण ते इथे आलेही नाहीत. मृतदेह घेऊन जा आणि पोस्टमार्टम करू घ्या, असं तहसीलदार म्हणाले. मृत कामगाराच्या भावाने हा आरोप केला आहे.
कंपनीत केमिकल आणि डिझेल टँक असल्याने लागलेली आग ही तीव्र झाली. त्यामुळे काही काळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्याठिकाणी बचाव कार्य करण्यात विलंब झाला होता. त्यामुळे अनेक जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यकात केली जात होती. त्यामुळे अजूनही काही मृतदेह भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
