प्रेक्षकांनी स्टेजवर पैसे फेकले, गौतमी पाटीलने डान्स थांबवला, तुफान राड्याने कार्यक्रमच उधळला

प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्रच बनलं आहे. ६० बाउन्सर, पोलीसांचा बंदोबस्त तरी गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झालाय आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तसेच मोठ्या बंदोबस्तात गौतमी पाटील हिला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढावे लागले.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गुरुवारी रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, गौतमीचा डान्स सुरू होताच काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. गौतमीने डान्स थांबविल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना ६० बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढं होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. अखेर बाउन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडली. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात असा राडा होत असेल तर गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची वेळ येऊ शकते अशी चर्चा आहे.

 ग्रामीण भागात गौतमी पाटीलची लोकप्रियता खूपच जास्त आहे. सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी येथे तर एका पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या वडिलांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी आजुबाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला महिला प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *