पोलीस भरतीतील मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणाचा मंगळवारी हॉटेलमध्ये मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरतीतील उमेदवाराचा मृत्यू होण्याची आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणीनंतर मृत्यू झाला होता.
अमर अशोक सोळंकी (२४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो अमरावती येथील नवसारीतील रहिवासी आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी तो मुंबईत आला होता. फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये सध्या तो वास्तव्यास होता. सोळंकी याने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचित व्यक्तीला सांगितले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंघोळ करत असताना त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी सोळंकीच्या परिचयातील एका तरुणीचा जबाब नोंदवून एमआरए मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. अस्वस्थ वाटत असताना त्याने या तरुणीला मदतीसाठी हॉटेलवर बोलावले होते. ती तेथे पोहोचली असता सोलके बेशुद्ध पडला होता. वैद्यकीय अहवालानुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी सांगितले.यापूर्वीही प्रकार..
यापूर्वीच्या एका घटनेत पोलीस भरतीसाठी आलेल्या गणेश उगले या २६ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर तो खाली कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होता.
