नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने दाखल केलेले प्रकरण रद्द

 मूळ गुन्हाच अस्तित्त्वात नसेल तर त्याआधारे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारी तक्रार (ईसीआयआर)कशी कायम राहू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता यांच्या विरोधात त्यांच्याविरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द केली.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द झाल्याने ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. त्यामुळे ईडीने दाखल केलेला ईसीआयआर आणि त्याआधारे सुरू केलेली कारवाई बेकायदा व कायद्याशी विसंगत आहे, असा दावा करून गोयल दाम्पत्याने ईडीने दाखल केलेले प्रकरण रद्द करण्याची मागणी केली होती. ती न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायामूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मान्य केली.

ईसीआयआर वैधानिक नव्हे, तर खासगी कागदपत्र आहे. त्यामुळे तो रद्द करता येऊ शकत नाही, असा दावा ईडीने मागील सुनावणीच्या वेळी केला होता. ईसीआयआर आणि तपास यंत्रणेने नोंदवलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) तुलना होऊ शकत नाही, असेही ईडीने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने मात्र ईडीच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ईडीच्या मते ईसीआयआरला काहीच महत्व नाही, ते एक साधे खासगी कागदपत्र आहे, तर ईडी ईसीआयआरच्या आधारे तपास कशी काय करू शकते ? अशी विचारणा न्यायालयाने केली होती. ईसीआयआर रद्द होऊ शकत नसल्याचे ईडीचे वक्तव्य गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *