राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरु आहे. शिंदे आणि आव्हाड यांच्यात खरे तर पूर्वीपासून चांगले सख्य होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये राजकीय वाद पाहायला मिळत आहे. त्यातच आता मुंब्रामधील कार्यकर्त्याच्या वाढदिवसामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी “५० खोके, एकदम ओके” असे लिहिलेला केक कापला. या केकवर ५०० आणि दोन हजारांच्या नोटांची रेलचेल दिसत आहे. तर छोट्या पुठ्ठ्याच्या केकवर ५० खोके, एकदम ओके, माजलेत बोके, अशा घोषणा लिहिलेल्या आहेत. विशेष म्हणजे योगायोगाने आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर हा केक कापून एकप्रकारे शिंदे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
