जगभरातील अनेक पर्यटनस्थळी कॅसिनो गेमिंग (Casino) ही एक मनोरंजनाची बाब समजली जाते आणि त्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती तसंच महसूलवाढीचे उद्दीष्टये साध्य केली जातात. या पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मनसेच्यावतीने एक पत्रही पाठवण्यात आलं आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंड, मकाऊ यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या देशांमध्येच नव्हे, तर आपले शेजारी राज्य असलेल्या गोव्यामध्येही कॅसिनो गेमिंगला परवानगी असल्यामुळे तिथे मोठया प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झालेला आहे, हे कुणीही नाकारु शकणार नाही, असं या पत्रात म्हटलंय.
गोवा राज्यात ऑफशोअर 6 कसीनो, ऑनशोअर 8 कसीनो आहेत. तर सिक्कीममध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये कसीनो गेमिंगला परवानगी आहे. याउलट, महाराष्ट्र हे उद्योग व्यवसायांच्या तसंच प्रगतीशील विचारांच्या दृष्टीने देशातील सर्वात पुढारलेलं राज्य असतानाही कसीनो गेमिंगबाबतच्या बुरसटलेल्या विचारांमुळे आपल्याच राज्याच्या विधिमंडळाने पारित केलेला महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण आणि कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अक्षरश: धूळ खात पडून आहे, असं मनसेने म्हटलं आहे.
