भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये प्रचंड विध्वंस, मृतांची संख्या ३०० च्या पुढे

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.८ मॅग्निट्युड इतकी होती. या भूकंपाचं केंद्र तुर्कस्तानमधल्या गाझियान्टेप शहराजवळ असल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपाने तूर्कस्तानात मोठा विध्वंस केला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून यामध्ये २३७ हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मिळाली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता या परिसरात भूकंपाचे हादरे बसले.

यूएस जियोलॉजिकल सर्वेने सांगितलं की, भूकंपाचं प्रमुख केंद्र हे गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर होतं. भूकंपाचे धक्के लेबनान आणि सीरियामध्ये देखील बसले आहेत. तिथल्या माध्यमांनी माहिती दिली आहे की, उत्तर सीरियातल्या अलेप्पो आणि हमा या शहरांमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती कोसलळल्या आहेत.

तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या भूकंपांमुळे दोन्ही देशात मिळून ३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

सीरियात मोठा विध्वंस

तूर्कस्तानाप्रमाणे सीरियामध्ये देखील भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. अलेप्पो आणि हमा शहरांमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. लोक पहाटेच्या साखरझोपेत असताना हा भूकंप झाला. सीरियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात भूकंपामुळे आतापर्यंत ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या ५१६ इतकी झाली आहे.

अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के

तूर्कस्तानशिवाय सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशांमधील भूकंपाचे फोटो व्हायरल होत आहेत. तूर्कस्तानात मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे. अनेक देशांमध्ये स्थानिक प्रशासनांनी भूकंपानंतर बचाव मोहिमा हाती घेतल्या आहेत.

पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित, वित्तहानीमुळे दुःख झाल्याचं ट्वीट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *