राज्यातील महिला कैद्यांच्या मुलांसाठी कारागृह प्रशासनाकडून ‘नन्हे कदम’ उपक्रम राबविण्यात आला आहे. मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
मुंबईतील भायखळा कारागृहात ३५० महिला कैदी आहेत. एक वर्षाच्या बालकांपासून सहा वर्षांपर्यंतची १५ मुले त्यांच्या आईसोबत कारागृहात दाखल आहेत. या मुलांना कारागृहाबाहेरील वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी, तसेच त्यांच्या भविष्यास उज्ज्वल दिशा मिळावी म्हणून शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत महिला सेविका आणि मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंगणवाडीतील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येणार आहे.
