संभाजीनगरमधील कन्नडच्या सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक अलिबागच्या काशिद समुद्राकिनारी सहलीसाठी आले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सहलीला आलेले सहा विद्यार्थी काशिद समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली.
स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय. तर दोघांचा मृत्यू झालाय. बुडालेल्या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. प्रणव कदम आणि रोहन बेडवाल अशी त्यांची नावं आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्यानं हे विद्यार्थी बुडाले. वाचवण्यात आलेल्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेतील 70 विद्यार्थी सहलीसाठी रायगड जिल्ह्यात आले होते. त्यांच्यासोबत 5 शिक्षक देखील होते. मुरुड जंजिरा येथील काशीद समुद्रकिनाऱ्यावर सहल आली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.
दरम्यान, शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही वर्षापुर्वी मुरुड समुद्र किनाऱ्यावर झालेल्या दुर्घटनेत पुण्यातील 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा काशिद समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडल्याने यंत्रणेला जाग येणार तरी कधी?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
