हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिर्डी ते नागपूरपर्यंत खुला झाला आहे. हा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबईमधील अंतर कमी झाले तर दुसरीकडे हा महामार्ग उभारण्यासाठी ज्यांचा हात लागला त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावरचा रस्ता तयार करणाऱ्या रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून मध्यप्रदेशातील 300 मजुरांना त्यांचे वेतन न दिल्याचे बातमी समोर आली आहे. या मजुरांना वेतन न मिळाल्याने त्यांनी रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनी मार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करीत होते. रात्रदिवस काम करून सुद्धा त्यांच्या घाम गाळलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे या 300 मजुरांनी किनगावराजा पोलिसात तक्रार देण्यासाठी 15 किमी पायी जाऊन प्रयत्न केला. मात्र राहेरी नदी पुलावर हा मजुरांचा मोर्चा पोलिसांनी अडविला व कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा केली. या चर्चेतून पुढील आठवड्यात या मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन जमा होईल असे आश्वासन या मजुरांना देण्यात आले. तरीही या मजुरांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून जोपर्यंत आमच्या मजुरीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मजुरांनी मांडली आहे.
यावेळी एमएसआरडीसीने अद्याप मजुरांचे पैसे न दिल्याचे स्वत: कबूल केले आहे. त्यामुळे या 300 मजुरांचे अडीच कोटी रुपये देणे बाकी असल्याचे कंपनीचे जे पी सिंग यांनी सांगितले आहे. दरम्यान मजुरांनी थोडा धीर धरावा असे सिंग यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आता समृद्धी महामार्गावर केलेल्या या 300 मजुरांना केव्हा मजुरी मिळेल याकडे मजुरांच्या कुटुंबंवाचे लक्ष लागून राहिले आहे.
