अखेर मुंबई – मांडवा वॉटर टॅक्सी थेट सेवा बंद ; वॉटर टॅक्सी केवळ शनिवार-रविवार

बेलापूर – मांडवा व्हाया मुंबई धावणारमंगल हनवते, लोकसत्ता मुंबई : मोठा गाजावाजा करीत १ नोव्हेंबरपासून मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल – मांडव्यादरम्यान सुरू करण्यात आलेली थेट वॉटर टॅक्सी सेवा प्रतिसादाअभावी अखेर बंद करण्याची नामुष्की नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडवर ओढावली आहे. कंपनीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान थेट सेवा बंद केली असून आता ही वॉटर टॅक्सी केवळ शनिवार-रविवारी बेलापूर – मांडवा व्हाया मुंबईदरम्यान धावणार आहे. तसेच तिच्या फेऱ्याही मर्यादित असणार आहेत. मुंबईकरांना झटपट अलिबागला पोहचणे शक्य व्हावे यासाठी १ नोव्हेंबरपासून मुंबई – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती.

नयनतारा शिपिंग कंपनीने देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वातानुकूलित आणि सुरक्षित अशी वॉटर टॅक्सी या मार्गावर सुरू केली. या वॉटर टॅक्सीने अवघ्या ४० मिनिटांमध्ये मुंबईहून अलिबागला पोहचणे शक्य होत होते. मुंबई – मांडवा जलमार्गावर आठवड्याचे सातही दिवस वॉटर टॅक्सी धावत होती. दिवसाला तीन-तीन अशा एकूण सहा फेऱ्या (मुंबई – मांडवा तीन आणि मांडवा – मुंबई तीन) होत होत्या.  मुंबईहून अलिबागला केवळ ४० मिनिटांत पोहचविणाऱ्या या वॉटर टॅक्सीला पर्यटक आणि प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. दिवसाला केवळ २० ते २५ प्रवासी या वॉटर टॅक्सीने प्रवास करीत होते. त्यामुळे देखभालीचा खर्चही भागवणे शक्य होत नव्हते. परिणामी ही सेवा कंपनीला परवडेनाशी झाली. त्यामुळे अखेर आता कंपनीने सोमवार ते शुक्रवार दरम्यानची सेवा पूर्णतः बंद केली आहे. आता केवळ शनिवार आणि रविवार अशी ही सेवा असणार आहे.

दरम्यानच्या काळात या कंपनीने बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती. मात्र या सेवेलाही प्रतिसाद न मिळाल्याने आणि अन्य काही अडचणींमुळे ही सेवा दोन दिवसातच बंद झाली. त्यास कंपनीने दुजोरा दिला आहे. आता मात्र कंपनीने सोमवार ते शुक्रवारदरम्यान केवळ गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे बेलापूर – मांडवा व्हाया मुंबई क्रूझ टर्मिनल आणि मांडवा ते बेलापूर व्हाया मुंबई क्रुझ टर्मिनल अशी सेवा केवळ शनिवार आणि रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.आर्थिक गणित बिघडलेमुंबई – मांडवा वॉटर टॅक्सी सेवेला सुरुवातीपासूनच प्रतिसाद मिळत नसल्याने तिकिटाचे दरही करण्यात आले होते. तिकिटांचे दर ४०० आणि ४५० रुपयांवरून अनुक्रमे  २५० आणि ३५० रुपये करण्यात आले होते. मात्र यानंतरही प्रवाशी संख्या वाढली नाही. २०० प्रवाशी क्षमता असलेली वॉटर टॅक्सी १०, १५ आणि २० प्रवाशांना घेऊन फेऱ्या करीत होती. एका फेरीसाठी कंपनीला येणारा खर्चही दिवसभराच्या फेरीतून निघत नसल्याने, आर्थिक गणित बिघडत गेले. अखेर सोमवारी ते शुक्रवारच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *