अमेरिकेतील लास वेगासमधील मॅकक्रॅन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्रिटीश एअरवेजच्या उड्डाणाच्या तयारीत असलेल्या बोईंग ७७७ या विमानाला अचानक आग लागली.
या विमानातून आगीचे लोळ बाहेर येताच जीव वाचवण्यासाठी आतील काही प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्या. या आगीमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग लागली त्यावेळी या विमानात १५९ प्रवासी आणि १३ विमान कर्मचारी होते. त्यापैकी तिघे किरकोळ भाजल्याचे वृत्त आहे.
ब्रिटीश एअरवेजचे हे विमान लंडनला निघाले होते. मॅकॅरान विमानतळावर हा अपघात झाला. विमान क्र. बीए२२७६ या विमानाच्या इंजिनमध्ये डाव्या बाजुला बिघाड झाल्याने विमानाला आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या अपघातानंतर विमानतळावरील एक धावपट्टी बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून सर्व प्रवाशी सुखरुप असल्याचे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन पॅसेफिक डिव्हिजनचे अध्यक्ष इयान ग्रेगोर यांनी सांगितले.

