टिटवाळ्या जवळील आपटी गावात एका शेतघरात रखवालदाराचे काम करणाऱ्या एका मद्यपीने रागाच्या भरात गुरुवारी रात्री पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. बाळु दुटे (३८) असे आरोपीचे नाव आहे. टिटवाळा पोलसांनी त्याला अटक केली आहे. टिटवाळा जवळील आपटी गाव परिसरात बिंदुसरा शेतघर आहे. या शेतघराच्या रखवालदारीसाठी शेतघर मालकाने बाळु दुटे (रा. शेलविरे, अकोले, जि. नगर) आणि त्याची पत्नी शेतघराच्या देखभाल आणि मजुरी कामासाठी ठेवले आहे.
बाळुला दारुचे व्यसन आहे. त्याचे पत्नी उषा (३१) हिच्या बरोबर किरकोळ कारणावरुन भांडण होत होते. गुरुवारी रात्री बाळू आणि उषा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. बाळूने मद्यपान केले असल्याने त्याने रागाच्या भरात शेतघरावर लाकूड तोडकामासाठी आणलेली कुऱ्हाड घेऊन पत्नीवर वार केले. दोघेच जण शेतघरात असल्याने पत्नी उषाला वाचविण्यासाठी कोणी पुढे आले नाही. हत्येनंतर पती बाळू पळून गेला. आपटी ग्रामस्थांना ही माहिती मिळताच त्यांनी टिटवाळा पोलिसांना कळविले. पोलिसांनी रात्रीतून शोध घेऊन फरार बाळुला अटक केली आहे. उषाचा भाऊ दत्तू परते यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.