महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ठाणे ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ठाणे ग्रंथोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, या उद्देश्याने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे १९ आणि २० नोव्हेंबर रोजी हा ग्रंथोत्सव पार पडणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘महिलांचे मराठी साहित्यातील योगदान’ याविषयावरील परिसंवादात चंद्रशेखर भारती व प्रा. ऋचा खापर्डे हे सहभागी होणार असून अध्यक्षस्थानी प्रा.स्वप्ना समेळ असणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुग्धा घाटे करणार आहेत. तर दुपारी २.३० वाजता काव्य संमेलन होणार आहे. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी अरुण म्हात्रे असणार आहेत. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा व उत्कृष्ठ ग्रंथालयांचा सत्कार करण्यात येणार आहे.
ग्रंथोत्सवाची सुरुवात शनिवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडींने होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर २.३० वाजता ‘समाज माध्यमांचे वाचक चळवळीवरील परिणाम’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विलास पवार असून यामध्ये नितिन केळकर, निकीता भागवत, मंजुषा सहाणे हे सहभागी होणार आहेत. सचिन आमडोस्कर हे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजता कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी चांगदेव काळे असणार आहेत. प्राची गडकरी, करुणा कल्याणकर व सुरेश पवार हे यात सहभागी होणार आहेत.

