आमच्या ठाण्याला काळीमा फासण्याचे काम शिंदे गटाचे नरेश म्हस्के करत आहे- खासदार राजन विचारे यांची टिका

वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये झालेल्या वादात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यादिशेने पाण्याची बाटली फेकण्यात आल्याचा प्रकार पोलीस ठाण्याबाहेर समोर आला होता. या घटनेनंतर राजन विचारे यांनी शिंदे गटावर टिका केली आहे. ‘मुख्यमंत्ऱ्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरू आहे, असा आरोप विचारे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या ठाणे शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केले आहे. या आमच्या ठाण्याला काळीमा फासण्याचे काम सध्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के करीत आहेत. असेही ते म्हणाले.

किसननगर येथील भटवाडी भागात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये मारहाणीचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या मारहाणीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेरही शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने खासदार राजन विचारे यांच्यादिशेने पाण्याची बाटली फेकण्यात आली होती. याप्रकारानंतर विचारे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

यानंतर खासदार राजन विचारे आणि पदाधिकारी श्रीनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असताना पोलीस स्थानकाबाहेर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांच्यासह शेकडोजण पोलीस ठाण्याभोवती जमले. तसेच अश्लील भाषेत घोषणाबाजी करून दमदाटी करण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला. मात्र तक्रार घेण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारीही जागेवर नव्हते. त्यामध्ये कोणी दत्ता फासले नामक असलेल्या या गटाच्या कार्यकर्त्याने पोलीस स्थानकामध्ये बिनधास्त घुसून बाहेर पडलात तर हात पाय तोडून टाकू म्हणून पोलिसांसमोर धमकावत निघून गेला. असा आरोप विचारे यांनी केला. या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु रात्री उशिरा याची रीतसर फिर्याद श्रीनगर पोलीस स्थानकामध्ये घेण्यात आल्याचेही विचारे म्हणाले.

आम्ही कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्या पद्धतीने खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे दाखल करून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. माझ्या ४० वर्षाच्या राजकारणात अशी गुंडशाही मी कधी पाहिली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात आम्ही आमच्या पक्ष वाढीसाठी फिरू नये हा एक प्रकारे लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.आम्ही यांना जुमानत नाही या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुंडाराज सध्या सुरू आहे. असे विधान राजन विचारे यांनी केले.शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या ठाणे शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केले आहे. या आमच्या ठाण्याला काळीमा फासण्याचे काम सध्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के करीत आहेत. सर्व जनताही उघड्या डोळ्यांनी बघत आहे. येत्या निवडणुकीमध्ये ही जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल असे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *