यावर्षी सोयाबीनचे भाव घसरत पाच हजाराच्या आसपासच असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामात सोयाबीन व रब्बी हंगामात हरभरा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी मोठी असते.भाव चांगला मिळाला तर उसापेक्षाही शेती परवडते मात्र या वाणाचे भाव पडत असल्याने पुन्हा एकदा शेतकरी उसाकडे वळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाडय़ात चांगला पाऊस झाला आहे. २०१५ च्या दुष्काळानंतर दरवर्षी पावसाचे प्रमाण चांगले आहे व त्यानंतर या भागातील उसाचे प्रमाणही दरवर्षी वाढते आहे .दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयापर्यंत वाढला होता तो गतवर्षी घसरत साडेसात हजार व आता पाच हजारांच्या खाली आला आहे .हरभऱ्याला शासनाने हमीभाव काहीही जाहीर केला तरी बाजारपेठेत हमीभावाने हरभरा विकला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याला हमीभावापेक्षा कमी भावाने हरभरा विकावा लागतो आहे. उसाच्या शेती ऐवजी सोयाबीन, तूर व हरभरा हे नगदी पिके शेतकरी घेत होता आता ही पिके घेणे परवडनासे झाले आहे. कारण पिकाचा लागवडीचा खर्च ,काढणीचा खर्च, फवारणी हा दरवर्षी वाढतो आहे व उत्पादकताही कमी होत आहे त्यामुळे शेती आतबट्टय़ात येते आहे .त्यामानाने अतिवृष्टी , संततधार, वादळ, वारे अशा नैसर्गिक संकटांना तुलनेने ऊस हे तोंड देण्यास सक्षम आहे. गेल्या काही वर्षांत ऊसाला चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे गतवर्षी उसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आता पुन्हा रब्बी हंगामापासून ऊस लागवडीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे थोडे बहुत पाणी होते ते शेतकरी उसाकडे वळत नव्हते मात्र आता ऊसाला चांगले पैसे मिळत आहेत.
सुदैवाने बहुतेक कारखाने चांगल्या स्थितीत आहेत त्यामुळे शेतकरी उसाकडे वळेल. यावर्षी एकूण मराठवाडय़ात ५० टक्क्यांपेक्षा अधिक खोडव्याचा ऊस आहे. त्यामुळे नवे क्षेत्र यावर्षी थोडे बहुत पण पुढच्या वर्षी मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे .अतिवृष्टी झाल्यामुळे व संततधार पावसामुळे आहे त्या उसाची वाढ फारशी झाली नाही. खोडवा उसात वजन घटते मात्र उतारा वाढतो. त्याचा लाभ साखर कारखान्यांना होतो. .गतवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न मराठवाडय़ात लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झाला होता या जिल्ह्यातील ऊस शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी पाठवला .अनेक शेतकऱ्यांचे अद्याप सर्व पैसे आलेले नाहीत त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. मात्र यावर्षी मराठवाडय़ातील बहुतेक साखर कारखान्यांनी स्वत:ची गाळप क्षमता वाढवली आहे. इथेनॉलच्या निर्मितीतही अनेक कारखाने नव्याने उतरत आहेत.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने सुरू करण्याचे नियोजन होते मात्र परतीच्या पावसाने एक महिना हंगाम लांबला आहे .हंगाम एक महिना लांबला असला तरी यावर्षी गतवर्षी सारखी स्थिती असणार नाही .एप्रिल अखेपर्यंत सर्व उसाचे गाळप होईल अशी साखर कारखान्याची स्थिती आहे. गतवर्षी अनेक साखर कारखान्यांनी १५ ते १८ महिन्यानंतर उसाचे गाळप केले. त्यामुळे सध्या अनेकांचा ऊस अजून बाल्यावस्थेतून बाहेर पडलेला नाही. त्याचाही फटका बसणार आहे, असे असले तरी शेतकऱ्याला हमखास भाव देणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. बंद पडलेले साखर कारखानेही या ना त्याकारणाने नव्याने सुरू झाले आहेत त्यामुळे गाळपाची क्षमता वाढते आहे. त्यातूनच शेतकऱ्यांसमोर उसाचे काय करायचे हा प्रश्न फारसा राहणार नाही. म्हणूनच पुढील वर्षी व या वर्षीच्या रब्बी हंगामात उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. मराठवाडय़ात पाण्याचे दुर्भिक्ष सातत्याने असायचे मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून सततचा पाऊस होतो आहे व दरवर्षी उसाचे क्षेत्र वाढते आहे. या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे असे आहे की आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रासारखी मराठवाडय़ातील शेतकऱ्याची स्थिती होईल व ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी अन्य पिके न घेता उसाकडेच वळतील.
गाळप होण्यास थोडा उशीर
यावर्षी २०२२-२३ सालच्या गाळपासाठी लातूर जिल्ह्यात ६३ हजार १५८ हेक्टर्स उसाचे क्षेत्र आहे. हेक्टरी सरासरी ९५ टन ऊस उत्पादित होईल व गाळप करणाऱ्या साखर कारखान्याची संख्या मात्र मोठी आहे. आता उसाच्या फडातील पाणी कमी झाले नसल्याने कारखान्यांचे गाळप होण्यास थोडा उशीर होत असल्याचे नॅचरल शुगर कारखान्याचे प्रमुख बी बी ठोंबरे यांनी सांगितले .उशीर जरी झाला तरी एप्रिल अखेर पर्यंत ऊस गाळपाविना राहणार नाही अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.
