सुमारे ३१ वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने अमरावती पोलिसांकडे केल्याने पोलीसही अवाक झालेत. ही महिला पाच वर्षांची असताना तिच्यावर भावाकडूनच बलात्कार करण्यात आला होता. हा प्रकार तिने आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांनी घराची इभ्रत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले, पण तीन दशके हे विष पचवणाऱ्या या महिलेने अखेर पोलीस ठाणे गाठले.
पीडित महिला पती आणि मुलासह दिल्लीजवळच्या नोएडा येथे राहते. पीडिता पाच वर्षांची असताना तिच्या सख्ख्या भावाने बलात्कार केला. लैंगिक शोषणाचा हा प्रकार अनेक वर्षे चालला. १९८३ ते १९९१ या कालावधीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नागरी वसाहतीत घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री या महिलेच्या भावाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेचा ५२ वर्षीय भाऊ मुंबईतील मालाड भागात राहतो. या प्रकरणी महिलेने दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगासह नोएडा पोलीस ठाण्यातदेखील तक्रार दाखल केली आहे.
पीडितेचे वडील अमरावतीत नोकरीवर असताना ती राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई, वडील आणि भावासह वास्तव्याला होती. त्यावेळी ही घटना घडली. आठ वर्षे पीडितेचे शोषण करण्यात आले. तिने पालकांना याची माहिती दिली, पण त्यांनीही दुर्लक्ष केले. नंतर तिचे आणि तिच्या भावाचे लग्न झाले. कालांतराने तिचे वडील दगावले. आईची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला चकार शब्द काढता आला नाही. तिच्या डोक्यात मात्र विचारचक्र फिरत राहिले. बलात्काराची जखम भरून निघू शकली नाही. अखेर ३१ वर्षांनतर तिने आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला.