ठाण्यात एका अज्ञाताने महिला ट्रॅफिक पोलिस कॉन्टेबलशी गैरवर्तन केलं. इतकंत नाही तर त्याने महिला पोलिसाची वर्दी फाडली. आरोपी इसम त्याच्या पत्नीला अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात घेऊन जात होता. परंतु प्रचंड ट्रॅफिकमुळे नाराज झाल्याने त्याने हे कृत्य केलं.
ट्रॅफिकमुळे अॅम्ब्युलन्स पुढे जाण्यास अडचण
वर्तकनगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक कुंभार यांच्या माहितीनुसार, महिला पोलिस अधिकारी शहरातील कॅडबरी जंक्शनवर शनिवारी ड्यूटी करत होती. त्याचवेळी अॅम्ब्युलन्स ट्रॅफिक सिग्नलजवळ पोहोचली. आरोपीने महिला पोलिसाला अॅम्ब्युलन्सजवळ बोलावलं आणि तिच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. माझ्या पत्नीला स्वाईन फ्लू झाला आहे आणि तिला तातडीने रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. पण प्रचंड ट्रॅफिकमुळे अॅम्ब्युलन्सला पुढे जाता येत नाही, असं आरोपी म्हणाला.
महिला पोलिसाची कॉलर पकडली
आरोपीची अद्याप ओळखली पटलेली नाही. दीपक कुंभार यांनी सांगितलं की, आरोपीने महिला कॉन्स्टेबलच्या वर्दीची कॉलर पडकली आणि तिला खेचलं, त्यानंतर तिची वर्दी फाडली. महिला कॉन्स्टेबलने रात्री उशिरा अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कॉन्स्टेबलला अॅम्ब्युलन्समध्ये खेचलं
पोलिसाच्या तक्रारीनुसार, ट्रॅफिक सिग्नलजवळ आरोपी माझ्यावर ओरडला. त्याने मला अॅम्ब्युलन्समध्ये खेचलं आणि रुग्णालयापर्यंत घेऊन गेला. त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. कुंभार यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 353 (सरकारी नोकराच्या कामात अडथळा आणणे), 354 (विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

