आयुष्यात चांगले मित्र असणे खूप महत्त्वाचे असते. अनेकदा आपले घरचेही आपल्या इतक्या जवळचे नसतात, जितके आपले मित्र असतात. एक चांगला मित्र प्रत्येक अडीअडचणीच्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मात्र आपल्या अशाच एखाद्या जीवाभावाच्या मित्राने अगदी क्षुल्लक कारणांवरून आपल्यावर चक्क कायदेशीर कारवाई केली तर? तुम्हाला ही मस्करी वाटत असेल, मात्र हे प्रकरण खरं आहे.
हरिद्वारमध्ये ही घटना घडली आहे. येथील एका मुलाचं नुकतंच लग्न झालं. यावेळी त्याने आपल्या मित्राला लग्नाचे आमंत्रण दिले, मात्र या आमंत्रण पत्रिकेतील वेळेच्या आधीच नवरदेवाची वरात निघून गेली. आपण येण्याआधी आपल्या मित्राची वरात निघून गेल्याने नवरदेवाच्या मित्राला मानसिक आघात झाला. यामुळे त्या मित्राने नवरदेवाला ५० लाखांची नोटीस बजावली आहे.
हे प्रकरण हरिद्वारच्या बहादूराबादच्या आराध्या कॉलनीत राहणार्या रवी नावाच्या तरुणाचे आहे, ज्याचे लग्न उत्तर प्रदेशातील धामपूर येथील अंजू नावाच्या मुलीशी निश्चित झाले होते. यानंतर रवीने सर्व मित्रांसोबत लग्नाची तयारी केली आणि त्यांना लग्नपत्रिका देऊन वरातील येण्यास सांगितले, मात्र लग्नाच्या दिवशी रवीची वरात नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच सायंकाळी पाच वाजायच्या आधीच निघाली.
रवीचा मित्र चंद्रशेखर संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचला होता, पण वरात निघून गेल्याचे समजताच त्याने रवीला फोन केला. रवीने फोन उचलला आणि वरात निघाली आहे म्हणून परत जा असे त्याला सांगितले. यामुळे चंद्रशेखर इतका दुखावला गेला की त्याने वकील अरुण भदौरिया यांच्यामार्फत रवीला बदनामीची नोटीस पाठवली.
“चंद्रशेखरला इतके अपमानास्पद वाटत होते की त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती, त्यानंतर मी त्याला न्याय देण्याचे आश्वासन देऊन आत्महत्या करण्यापासून रोखले,” भदौरिया म्हणाले. रवीने तीन दिवसांत माफी मागावी आणि ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे मानहानीच्या नोटीसमध्ये लिहिले आहे. रवीने तसे न केल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रशेखरने वरातील घेऊन न गेलेल्या त्याच्या नवरदेव मित्राला बोलावून आपली बदनामी झाल्याची माहिती दिली, मात्र त्या मित्राने त्याचे बोलणे गांभीर्याने न घेतल्याने त्याने त्याला ५० लाख रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
