राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आणि कुलाबा वेधशाळेने विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. नदी काठच्या गावांता सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर, गडचिरोली जनजीवन विस्कळीत
नागपूर ग्रामीण भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. काटोल-वरुड रस्ता पाण्याखाली असल्याने पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर राज्य मार्ग 253 पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बंद आहे. जाम नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जनजीवन ठप्प झालंय. एटापल्ली आणि मुलचेरा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर गडचिरोली तालुक्यातही गेल्या 24 तासात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. आष्टी- आलापल्ली मार्गावरील दिना नदीचा पूल पुराखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. खेड,चिपळूण, दापोलीसह गुहागर तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून इशारा पातळीचीच्यावर पाणी आल्याने प्रशासन सर्तक झाले आहे. दरम्यान रघुवीर घाटात ही दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
