ऑनलाइन वाइन खरेदी करणं ज्येष्ठ नागरिकाला पडलं महागात; ओटीपी दिला आणि…

ऑनलाइन वाइन मागवणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाइन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ओटीपीची मागणी करून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन मोबाइलधारक व्यक्तीवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार १५ मे २०२१ ते १७ मे २०२१ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार व्यक्ती औंध येथे विद्यापीठ रस्त्यावर राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने त्यांच्या राहत्या घराजवळील वाइन शॉप शोधून काढण्यासाठी गुगलवर सर्च केले. त्यावेळी औंधला आनंदपार्क येथील एका वाइन शॉपची माहिती त्यांना मिळाली. त्यात नमूद असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. समोरील व्यक्तीला घरपोच वाइन हवी असल्याबाबत सांगितले. त्यावेळ‌ी समोरील व्यक्तीने तक्रारदाराचा विश्वास संपादन करून व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तक्रारदाराच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मागून घेतला. त्याद्वारे तक्रारदाराच्या क्रेडीट कार्डवरून ४८ हजार ११० रुपयांचा व्यवहार केला. मात्र, तक्रारदाराला घरपोच वाइन मिळाली नाही. त्यामुळे ती रक्‍कम परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी समोरील व्यक्तीने तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. त्यांच्या खात्यात पैसे पाठविण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. त्या खात्यातून पुन्हा आठ लाख ४८ हजार ८३८ रुपये काढून घेतले. अशा पद्धतीने तक्रारदाराची एकूण आठ लाख ९६ हजार ९४८ रुपयांची फसवणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *