राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शहरासह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांता बुधवारी शुकशुकाट होता. शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महसूल, तर जलसंपदा विभागात संबंधित शासकीय कर्मचारी संघटनांनी धरणे आंदोलन केले. विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि कंत्राटी कामगार कार्यालयांमध्ये हजर होते ; पण अन्य कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज ठप्प झाले. शासकीय मध्यवर्ती संघटनांनी संप मागे घेतल्याने गुरूवारी शासकीय कार्यालयांमधील कामकाज पूर्ववत होणार आहे.
नवीन निवृत्तीवेतन योजना बंद करून जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, विविध शासकीय खात्यातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, केंद्राप्रमाणे महिलांना बाल संगोपन रजा दोन वर्षांची मिळावी, अनुकंपाची भरती तातडीने करावी यांसह एकूण २२ मागण्यांसाठी राज्यातील महसूल, आरोग्य, कृषी, जलसंपदा व इतर शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. महसूल विभागातील शिपाई, कोतवाल, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी, नायब तहसिलदार यांच्यासह अन्य शासकीय विभागातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये सहकार, कृषी आणि शिक्षण अशा राज्यातील काही प्रमुख विभागांची आयुक्तालये आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, भाषा विभाग, शहर अन्नधान्य वितरण विभाग आदी विभागही आहेत.
या सर्व विभागांतील कर्मचारी संपात सामील झाल्याने कामकाज होऊ शकले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागामध्ये नेहमी गर्दी असते. मात्र, कर्मचारी संपात सहभागी असल्याने या विभागात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक; तसेच जमाबंदी आयुक्त यांचे कार्यालय आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुळशी-मावळ उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे. या विभागांच्या कामकाजावर परिणाम झाला. विधान भवन आवारात असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी हे संपात सहभागी झाले होते.
दरम्यान मध्यवर्ती शासकीय इमारत परिसरात विविध शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महसूल कर्मचारी संघटनेचे मध्यवर्ती अध्यक्ष मारुती शिंदे, महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
