हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या बैठकीत तयार करण्यात आलेला हळद संशोधन प्रक्रिया धोरण अभ्यास मसुदा मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन लवकरच हळद धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील यांनी दिली. मंत्रालयातील कृषी विभागात पार पडलेल्या या हळद संशोधन मसुदा धोरण प्रक्रिये संदर्भातील बैठकीची माहिती खासदार पाटील यांनी येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
हळद धोरण समितीने तयार केलेला अहवाल कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. भारत हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार असून देशात प्रामुख्याने महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, तेलंगणा,तामिळनाडू, छत्तीसगढ या राज्यात हळद उत्पादन घेतले जाते. हळद पिकाखालील क्षेत्रानुसार महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य असून हिंगोली जिल्हा हळद उत्पादनात राज्यात आघाडीवर असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले.
अभ्यास समितीच्या विविध बैठका आत्तापर्यंत पार पडल्या असून यात हळदीचे नवीन संकरित बियाणे, हळदीसाठी विम्याची तरतूद, खत आणि पाण्याचे योग्य नियोजन, अवजारे, हळद निर्यात धोरण, उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर, हळदीसाठी लागणारे कृषी यांत्रिकीकरण, हळद काढणी पश्चात व्यवस्थापन आदी विषयावर चर्चा झाल्याचेही खासदार पाटील म्हणाले. या बैठकीस राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, आमदार अमित झनक, आमदार महेश शिंदे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवळे, कृषि आयुक्त, धीरज कुमार आदी उपस्थित होते.
