राज्य पोलीस विभागही करोनाच्या विळख्यात? ; आतापर्यंत २६५ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू

देशभरासह राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अधिकच झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोनाच्या विळख्यात सर्व सामान्य माणसापासून ते अगदी मंत्र्यांपर्यंत सर्वचजण सापडत आहेत. तर, नागरिकांनी करोना नियमांचे पालन करावे यासाठी प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरून चोवीस तास कार्यरत असलेल्या राज्याच्या पोलीस विभागासही करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील माहिती देखील समोर आली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत राज्यात करोनामुळे २६५ पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. तर, यात मुंबई पोलिसांमध्ये सर्वाधित १२६ पोलिसांच्या मृत्यूची नोंद आहे. सध्या राज्य पोलिस दलात करोनाच्या २ हजार १४५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

चार दिवसांपूर्वी मुंबईत एकाच दिवसात ९३ पोलीस करोनाबाधित आढळले होते. करोना काळात नियमांची अंमलबजावणी करण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असतात. त्यातूनच ते संसर्गाचा बळी ठरल्याची शक्यता आहे.

रविवारी झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांमधील लसीकरण वेगाने करण्यासंदर्भातील निर्देश पंतप्रधानांनी दिले होते. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असंही मोदी या बैठकी म्हणाले होते. २०२० पासून पंतप्रधानांनी वेळोवेळी अशापद्धतीने मुख्यमंत्र्यांसोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकी घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *