दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मंगळवारी ‘यलो अॅलर्ट’ घोषित केला. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, व्यायामशाळा लवकरच बंद होणार आहेत. त्याशिवाय जीवनावश्यक वस्तू वगळता दुकानांवरही बंदीची कुऱ्हाड कोसळणार आहे. मेट्रो ट्रेन आणि बस ५० टक्के क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने प्रतिसाद कृती योजना तयार केली असून रात्री १० ते पहाटे ५ या कालावधीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. विवाह समारंभ आणि अंत्यसंस्काराला केवळ २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यांना पूर्णपणे बंदी असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.
