शाळा सुरू होऊनही बस बंदच, विद्यार्थ्यांचे हाल

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या. परंतु वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने मुंबई महानगरातील विद्यार्थ्यांचे शाळेत जाताना अतोनात हाल होऊ लागले आहेत. अपुरे मनुष्यबळ, राज्य शासन व परिवहन विभागाची कठोर नियमावली, इंधनाचे वाढलेले दर इत्यादींमुळे शाळेचे बसचालक, मालकांसमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. परिणामी मुंबई महानगरातील सुमारे आठ हजार शाळा बस अद्यापही पूर्णपणे धावू शकलेल्या नाहीत. त्यातच संपामुळे एसटीचीही सेवा अपुरी असून पालक, विद्यार्थ्यांना रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.

 इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा राज्यातील ग्रामीण भागात १ डिसेंबरपासून आणि शहरी भागात १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये काहीसा उत्साह असला तरीही शाळा बस सेवा आणि एसटीअभावी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मुंबई महानगरात लोकल, रिक्षा, टॅक्सी, पालिकांच्या परिवहन सेवा असूनही पालक, विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवासासाठी दोन लसमात्रेची अट, तिकीट, पास काढण्यासाठी खिडक्यांसमोर असलेल्या रांगा, सकाळच्या वेळी लोकल गाडय़ांना वाढलेली प्रचंड गर्दी यामुळे पालक विद्यार्थ्यांना लोकलमधून सध्या तरी घेऊन जाण्यास तयार नाहीत. रिक्षा, टॅक्सींचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे स्थानिक पालिकांच्या बस सेवांवरच अवलंबून राहावे लागते. मात्र विलंबाने येणारी बस, प्रवाशांची गर्दी आणि संसर्गाचा धोका लक्षात घेता या बसमधून मुलांना घेऊन जाणे पालकांना शक्य होत नाही.शाळा बसचालक अस्वस्थ

राज्यात साधारण ४० हजारांहून अधिक शाळा बस आहेत. मुंबई महानगरात त्यांची संख्या आठ हजारांच्या घरात आहे. मात्र मुंबई महानगरात आठ हजार शाळा बसही धावू शकलेल्या नाहीत, असा दावा स्कूल बस ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला. करोनाकाळात शाळा बंद असल्याने शाळा बसही एका जागी उभ्या होत्या. परिणामी शाळाबसचे चालक, महिला मदतनीस यांनी नोकरीसाठी दुसरा पर्याय निवडला. अचानक शाळांची तारीख जाहीर झाली. परंतु चालक आणि मदतनीस यांच्याशिवाय शाळा बस चालवणे अशक्य असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे नवे संकट उभे राहिले आहे. करोना संसर्ग सुरू असल्याने शाळा बसही ५० टक्के आसन क्षमतेने चालविण्याची अट शासनाने घातली आहे. परंतु ते परवडणारे नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शाळा बसची कालमर्यादा आठ वर्षे असते. त्यापैकी दोन वर्षे करोनाकाळात गेली. त्यामुळे बसच्या कालमर्यादेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याचा अद्याप विचार झालेला नाही, असे गर्ग म्हणाले. परिणामी मुंबई महानगरात आठ हजार स्कूल बस असूनही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी त्या धाऊ शकलेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वाहनांच्या कालमर्यादेबाबत न्यायालयाने आदेश दिले असून त्याचे पालन करावे लागेल. कर आणि अन्य मागण्यांसंदर्भात विचार होत असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *