रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यात खालापूर, पाली, माणगाव, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या नगरपंचायतींचा समावेश आहे. यातील पाणी आणि माणगाव नगरपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. तर उर्वरित नगरपंचायतीवर सत्ताधारी पक्षांसमोर वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.
खालापूर नगरपंचायतीवर शेकापची सत्ता आहे. तळा आणि पोलादपूर नगरपंचायती शिवसेनेकडे आहेत. तर म्हसळा आणि माणगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. नव्याने स्थापन झालेल्या पाली नगरपंचायतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात घटक पक्षांना अपयश आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळ्यांवर सोयीस्कर आघाड्यांवर राजकीय पक्षांनी भर दिला आहे. खालापूरमध्ये शेकाप विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. तर पाली येथे शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. शिवसेना, भाजप, मनसे त्यांच्या विरोधात स्वबळावर आपली ताकद आजमावत आहेत.
तळा आणि म्हसळा येथे शिवसेना विरोधात राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. काँग्रेसने या दोन्ही ठिकाणी शिवसेनेशी युती केली आहे. माणगाव नगरपंचायतीसाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. कारण इथे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्वच शिवसेना, भाजप आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. शेकाप इथे एकच जागा लढवत असून उर्वरित ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इथे अटीतटीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पोलादपूरमध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रस्तापितांना रोखण्यासाठी युत्या आघाड्यांचा सोयीस्कर पॅटर्न सर्वच पक्षांनी अवलंबिल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीकडून तटकरे कुटुंबीयांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी तळा, म्हसळा आणि माणगाव नगरपंचायतींवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमदार भरत गोगावले आणि जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे यांनी प्रचाराची बाजू सांभाळली आहे. शेकापकडून माजी आमदार सुभाष पाटील आणि आमदार जयंत पाटील निवडणूक प्रचारात उतरले आहेत.
