द्राक्ष बागायतदारांना फटका; पंचनाम्याचाही पत्ता नाही; २१ हजार हेक्टरवरील फळबागांची हानी

सोलापूर जिल्ह्यात सातत्याने झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा मोठा फटका हजारो एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांना बसला आहे. द्राक्षबागांसह सुमारे २१ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रातील फळबागांची हानी झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढील संकटाची मालिका संपायचे नाव घेईना, अशी परिस्थिती दिसत आहे. मात्र दुसरीकडे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना त्या दिशेने प्रशासनाची पावले पडत नाहीत.

गेल्या महिन्यात सातत्याने झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील ८४३ गावांमधील ४० हजार ७८४ हेक्टर क्षेत्रातील पिकांना मोठा फटका बसला आहे. बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या ६९ हजार ५७१ इतकी आहे.जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, माढा या तीन तालुक्यांमध्ये पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याबद्दल शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अलीकडेच मिळाली आहे. मागील संकटातून कसेबसे बाहेर पडले असताना यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले असताना त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात सातत्याने पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे. यात एकूणच ४० हजार ७८४ हेक्टर बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक २१ हजार ३५६ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. तर १८ हजार ८२५ हेक्टर क्षेत्रातील बागायत शेतीची हानी झाली आहे. जिरायत शेतीचे झालेले नुकसान ६०३ हेक्टर क्षेत्रात आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठविलेल्या अहवालात देण्यात आली आहे.

नुकसान झालेल्या फळबागांमध्ये द्राक्षे व र्डांळब बागांची संख्या जास्त आहे. द्राक्षबागांमध्ये छाटणी होऊन काही ठिकाणी पोंगा व फुलोरा अवस्थेत असलेल्या आणि नव्याने फुटवा फुटण्याचा मोसम असताना अवकाळी पावसाचा दणका बसला आहे. द्राक्षघडांमध्ये पावसाचे पाणी शिरून घडकूज रोग पसरला आहे. डावणी, भुरी, करपा, मणीगळ, बुरशी यांच्या प्रादुर्भावामुळे ४० ते ५० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याची भीती दक्षिण सोलापूर तालुक्यातील ज्येष्ठ द्राक्ष बागायतदार डॉ. चन्नवीर हविनाळे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात द्राक्ष बागांचे क्षेत्र ८० हजार एकरपर्यंत असून यात २५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची संख्या आहे.

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हजारो टन द्राक्षे अक्षरश: रस्त्यावर टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गीसारख्या द्राक्षबागांमुळे सधन बनलेल्या गावात खराब झालेली द्राक्षे रस्त्यावर फेकली जात आहेत. अन्य गावांमध्येही हेच चित्र दिसून येते.

या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी र्मिंलद शंभरकर यांची भेट घेऊन द्राक्ष बागायतदारांचे दुखणे मांडण्यात आले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही या शिष्टमंडळासोबत येऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख सचिव गौसअहमद शेख, शंकर येणेगुरे, सकलेश लिगाडे, बाळासाहेब कस्तुरे, कुंडलिकराव माने, संघाचे व्यवस्थापक दिलीप माने आदींनी द्राक्ष बागायतदारांच्या व्यथा मांडून शासनाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. परंतु शासनाच्या निकषानुसार जर एका दिवशी ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर ती अतिवृष्टी झाल्याचे गृहीत धरून त्यातील शेती नुकसानीला शासनाकडून मदत मिळू शकते. परंतु प्रश्न अतिवृष्टीमुळे नव्हे तर सातत्याने पडालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल अतिवृष्टीचा निकष बाजूला ठेवून शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीच्या तुलनेत भरपाई देण्याचा शासकीय पातळीवर निर्णय घेण्याची मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

शेजारच्या जिल्ह्यात पंचनामे

शेजारच्या सांगली, पुणे, नगर, नाशिक भागात नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे झाले आहेत. सोलापुरात मात्र पंचनामे झाले नाहीत. ही अडचण तात्काळ सोडविण्याची अपेक्षा आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तडे गेलेल्या द्राक्ष बागांचे बेदाणे बनविण्यासाठी कांदा चाळ अनुदान योजनेप्रमाणे बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारण्यास अनुदान द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बागा वाचविण्यासाठी खते, रोगप्रतिकारक औषधांचा खर्च दीडपट ते दुप्पट म्हणजे जवळपास एकरी अडीच ते तीन लाखांपर्यंत गेला आहे. हा खर्च पाहता निदान खर्च भागण्यापुरता द्राक्षाला भाव मिळेल काय, याचीही चिंता आहे. र्डांळब बागांची स्थितीही केविलवाणी झाली आहे. तेल्या आणि मर रोगांचा प्रादुर्भाव कायम असताना अवकाळी पावसाने संकटात आणखी भर पडली आहे. कांदा पिकांचे झालेले नुकसानही मोठे आहे. काढणीला आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा भिजला आहे. शेतकऱ्यांनी आहे त्या परिस्थितीत खराब झालेला कांदा बाजारात विकण्यासाठी आणला असता त्यास भाव मिळू शकला नाही.

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले नुकसान :

पंढरपूर-९६४६ हेक्टर, बार्शी-९५७१.७ हेक्टर, माढा-८५०६ हेक्टर, मंगळवेढा-३२६५ हेक्टर, करमाळा-३२२५ हेक्टर, मोहोळ-२६०५ हेक्टर, दक्षिण सोलापूर-१२४२.४ हेक्टर, सांगोला-९३७ हेक्टर, अक्कलकोट-८०२ हेक्टर, माळशिरस-४९६.२ हेक्टर आणि उत्तर सोलापूर-४८८.५ हेक्टर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *