रायगडमध्ये एसटी संपामुळे १० कोटींचे नुकसान

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे रायगड जिल्ह्यात दहा कोटींचे नुकसान झाले आहे. दररोज सुमारे ३५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. ३८० कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि ११० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करूनही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील प्रवाश्यांचे हाल सुरु आहेत. खाजगी आणि महागड्या प्रवासी साधनांचा पर्याय करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

राज्य परीवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रायगड विभागात एकूण आठ आगार (डेपो) आहेत. त्यात माणगाव, महाड , कर्जत, श्रीवर्धन, मुरूड , अलिबग, रोहा आणि पेण यांचा समावेश आहे. संपाचा एसटीच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. रायगड जिल्हयातील ८ आगारांमधील ४०० दररोज एसटी बसेस दररोज धावतात. दिवसाला या बसेसमधून जवळपास ७५ हजार प्रवासी प्रवास करतात. दिवसभरात १ लाख १० हजार किलोमीटरचा प्रवास या बसेस करत असून त्यातून एसटी महामंडळाला दररोज ३५ लाख रूपये इतके उत्पन्न मिळते. मात्र या संपामुळे गेल्या महिन्याभरात सुमारे १० कोटी रुपयांचे एसटीचे हे उत्पन्न बुडाले आहे. संपाचा सर्वाधिक फटका हा ग्रामिण भागातील प्रवाश्यांना बसला आहे. संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने प्रवाश्यांचे हाल सुरु आहेत. त्यांना महागड्या प्रवासी साधनांचा वापर करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचेही कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरवातीला नागरीकांकडून मिळाणी सहानुभूती आता संपली असून, नागरीकांडून संपकरयाबाबत संताप व्यक्त होण्यास सुरवात झाली आहे.

६९० कर्मचारी कामावर परतले

परीवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनावरून काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आतापर्यंत जिल्हयातील वेगवेगळया आगारांमध्ये ६९० कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यात १०६ चालक आणि ९९ वाहकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या मार्फत माणगाव, महाड , कर्जत, श्रीवर्धन, अलिबग, रोहा आणि पेण या ७ आगारातून जिल्हयात किरकोळ स्वरूपात एसटी कडून प्रवासी सेवा दिली जात आहे. गेल्या १५ दिवसात त्यातून ५० लाख रूपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *