साताऱ्यात अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी, द्राक्षांना फटका

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे सातारा जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेती पिकांना अवकाळी पावसाने झोडपले. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.  या पावसाचा सर्वाधिक फटका माण, खटाव,वाई, महाबळेश्वर, जावली, कोरेगाव, फलटण  तालुक्यांना  बसला. यामध्ये सर्वाधिक नुकसान स्ट्रॉबेरी पिकाचे झाले आहे. कांदा, रब्बी ज्वारी, मका, द्राक्ष आणि र्डांळब पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मात्र या नुकसानीची तरी तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतक ऱ्यांतून होत आहे.

सातारा, कोरेगाव, खटाव, माण, महाबळेश्वर, वाई, जावळी, फलटण, कराड, पाटण येथील प्रत्यक्ष गाव निहाय नुकसानीची पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यावेळी रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, द्राक्ष, र्डांळब इतर पिकांचे सोळा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी ज्वारीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ज्वारी शेतात आडवी झाली आहे. त्यामुळे उशिरा पेर केलेल्या शेतकऱ्यांनाही ज्वारी काढून फेरपेरणी करणार आहेत. कांदा लागवड केलेली रोपे वाफ्यात पाणी सोठल्याने कुजली आहेत, तर काही ठिकाणी रोपे पावसाच्या पाण्याने शेतातून वाहून गेली आहेत. कांदा पिकाचे सुमारे साडेचार हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. सध्या भात काढणी झोडणी अंतिम टप्प्यात आली असून शेतात काढलेले भात भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची भात काढणी संपलेली आहे, त्या शेतकऱ्यांचा भाताचा पेंढा अजूनही शेतात असल्याने हा पेंढा भिजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीची तिच्या मोहक सुगंध आणि चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून ओळख आहे. ज्यांनी एकदा हे फळ खावून पाहिले आहे त्यांच्या समोर स्ट्रॉबेरीचे नाव काढताच त्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. अगदी अपवादात्मक काही लोकांना कदाचित हे रसाळ फळ आवडत देखील नसेल. मात्र, स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. वेगवेगळ्या आइसक्रीम, मिल्क शेक, चॉकलेट आणि जाम बणवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर होतो. आपल्याकडे महाबळेश्वर, पाचगणी वाई जावळी येथे साडेचार हजार एकरवर स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जाते. सध्या स्ट्रॉबेरीचा मोसम असून, चांगल्या दर्जाची स्ट्रॉबेरी फळबाजारात सहज मिळते.

स्ट्रॉबेरी केवळ चविला चांगली लागते म्हणून खायची नाही तर, तिचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. मात्र मागील आठवड्यात अवकाळी पावसाने व हवामान बदलाने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे आतोनात नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने अक्षरश: शेतकऱ्यांनी फळे तोडून उकिरड्यावर टाकली. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे स्ट्रॉबेरी कुजली.

सध्या असलेले ढगाळ वातावरण, दाट धुके आणि झालेल्या मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाने फळे नासली असून पिकावर करपा पडला आहे. त्यामुळे काही दिवस स्ट्रॉबेरी मिळणे दुरापास्त होणार आहे. सध्याचा हा बहर पूर्णपणे वाया गेला असून येत्या नाताळला स्ट्रॉबेरी मिळेल की नाही याची शाश्वती देता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची फळ खराब झाली आहेत. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखांच्या घरात आर्थिक नुकसान होणार आहे. थंड वातावरणामुळे साताऱ्यात महाबळेश्वर, वाई, जावळीला परिसरात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर स्ट्रॉबेरीचं पिक घेतलं जातं. या भागातील शेतकऱ्यांच्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत स्ट्रॉबेरी असल्यामुळे आता या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

महाबळेश्वर, वाईमध्ये उत्पादित झालेली स्ट्रॉबेरी ही बहुतांश प्रमाणात निर्यात केली जाते. या स्ट्रॉबेरीला सुरवातीला २०० ते ३०० रुपये दरम्यान किलो असा दरही मिळतो. परंतू यंदा पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. अनेक फळांमध्ये आताच कीड लागल्यामुळे स्थानिक बाजारातही हे उत्पादन घेऊन जाण्याचा काहीच फायदा नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली आहे. प्रथम टप्यात उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजुरी देऊन, उर्वरित क्षेत्रासाठी तातडीने निधीची मागणी सादर करण्याच्या सूचनाही कृषी विभागास दिल्या आहेत . – शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

अवकाळी पावसाने आमचे स्ट्रॉबेरी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून स्ट्रॉबेरी नासल्याने ती आम्ही शेवटी टाकून दिली आहे. ऐन हंगामात आम्हाला मोठा फटका बसला असून शासनाने याबाबत कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *