उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाले आहेत. मात्र भाजपाने या बंदलाविरोध केला असून सामान्य जनजीवन विस्कळीत होत असेल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असं म्हटलं आहे. मात्र बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
“शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

