२० टक्क्यांतील घरांना सर्वाधिक पसंती

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८९८४ घरांसाठीच्या सोडतीतील २० टक्क्यांमधील (खासगी विकासकांकडून मिळालेल्या) घरांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. २० टक्क्यांतील ८१२ घरांसाठी एकूण अर्जाच्या ८४ टक्के अर्थात दोन लाख सात हजार १८० अर्ज सादर झाले आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेतील (पीएमएवाय) घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीत पीएमएवायमधील सर्वाधिक सहा हजार १८० घरे असताना यासाठी केवळ ११ हजार २८५ अर्ज आले आहेत.

बुधवारी जाहीर झालेल्या स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीनुसार दोन लाख ४६ हजार अर्ज सादर झाले आहेत. हा प्रतिसाद चांगला असला तरी पीएमएवाय आणि कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील घरांना अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. कोकण मंडळाकडून विरार-बोळिंज आणि मीरा रोड येथे मोठे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. या गृहप्रकल्पातील १,९९२ घरे सोडतीत समाविष्ट असून यासाठी २८ हजार १९७ अर्ज आले आहेत. कल्याणमधील खोणी आणि शिरढोण तसेच भंडार्ली येथे पीएमएवाय योजनेखाली मोठय़ा संख्येने घरे बांधली जात आहेत. २०१८ मध्ये खोणी आणि शिरढोणमधील घरांसाठी सोडत निघालेली आहे. या वेळी ही या घरांना कमी प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या घरांना अर्जदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. सहा हजार १८० असा घरांसाठी केवळ ११ हजार २८५ अर्ज सादर झाले आहेत.

कोकण मंडळाला २० टक्के योजनेअंतर्गत ठाण्यात पहिल्यांदाच खासगी विकासकांकडून म्हाडाच्या हिश्शातील घरे मिळाली आहेत. ही ८१२ घरे असून खासगी विकासकांकडून या घरांची निर्मिती करण्यात आल्याने आणि खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरांच्या किमतीच्या तुलनेत कमी किमतीत म्हाडाकडून ती मिळणार आहेत. त्यामुळे या घरांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. ही केवळ ८१२ घरे असताना त्यासाठी तब्बल दोन लाख सात हजार २०८ अर्ज आले आहेत.

सोडतीला मिळालेला एकूण प्रतिसाद समाधानकारक आहे. कोकण मंडळाच्या प्रकल्पातील घरांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पीएमएवायमधील घरांना काहीसा कमी प्रतिसाद आहे. देशात कुठेही घर नसावे ही मुख्य अट या घरांसाठी असल्याने तसेच यासाठी पीएमएवाय नोंदणी आवश्यक असल्याने या घरांसाठी कमी अर्ज आले. पण असे असले तरी या वेळी एकही घर रिकामे राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *