‘ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होत आहेत. एसओपीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू व्हाव्यात. मुलांना शाळेत पाठवताना पालकांची संमती तर आवश्यक आहेच, शिवाय पालकांचे सहकार्यही आवश्यक आहे. मुलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्व एकत्रित येऊन ही जबाबदारी पार पाडू,’ असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता वेबिनार आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
गायकवाड म्हणाल्या, ‘यापूर्वीही शाळा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. काही ठिकाणी शाळा सुरूही झाल्या होत्या. आताही कोविड टास्क फोर्सशी बोलून आम्ही शाळा सुरू करण्यासंबंधी एसओपी जाहीर केल्या आहेत. शाळांशी संबंधित सर्व घटकांसोबत आम्ही चर्चा करत आहोत.’
राज्याच्या टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. समीर दलवाई, शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी, माजी शिक्षण संचालक, शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेत मार्गदर्शन केले. सुमारे दीड वर्षाच्या मोठ्या खंडानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक, पालकांनी मुलांना सुरक्षित आणि आनंदी वातावरणात पुन्हा शाळेशी जुळवून घेण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करायला हवेत, त्याबाबती या वेबनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
