येथील राबोडी भागात रविवारी पहाटे २५ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी झाली.
रमिझ शेख (३२) आणि गौस तांबोळी (४०) अशी मृतांची नावे असून फराह तांबोळी (१०) या घटनेत जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाणे येथील राबोडी एक भागात खत्री इमारत आहे. या इमारतीला तीन विंग आहेत. रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या सी विंगमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तो थेट तळमजल्यावर आला. या दुर्घटनेत रमिझ, गौस आणि फराह हे तिघेही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. तर, दुर्घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. या दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. या पथकांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रमिझ, गौस आणि फराह या तिघांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी रमिझ आणि गौस या दोघांचा मृत्यू झाला, तर फराहवर उपचार सुरू आहेत.
