जिल्ह्यातील ३५२ गावे करोनामुक्त

पहिल्या लाटेचा अनुभव घेऊन दुसऱ्या लाटेत काही प्रमाणात सक्षम झालेली आरोग्य व्यवस्था, नागरिकांचे लसीकरण तसेच करोनाविषयी जनजागृती यांमुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांसह ग्रामीण भागातील करोना संसर्ग ओसरू लागला आहे. जिल्ह्य़ातील ४३१ पैकी ३५२ गावे करोनामुक्त झाली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २८ दिवसांत या सर्वच गावांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून आले. शहरी भागांसह ग्रामीण भागांतही रुग्णांची संख्या अधिक होती. कल्याण, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ आणि शहापूर या तालुक्यांतील ग्रामीण भागांमध्ये दररोज सरासरी शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. पहिल्या लाटेत उपचारादरम्यान आलेले अडथळे दुसऱ्या लाटेत उद्भवू नयेत यासाठी आरोग्य व्यवस्था काही प्रमाणात सक्षम करण्यात आली.

ग्रामीण भागात करोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने चाचणी, तपासणी, सर्वेक्षण, उपचार आणि लसीकरण ही पाचसूत्री योजना अवलंबली आहे. यासाठी तालुका पातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून हे अधिकारी याकडे लक्ष देतात. करोनाची लागण होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती देण्यासाठी पथके गावोगावी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यासह जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, आशासेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने दररोज एक लाखाहून अधिक गावातील नागरिकांचे ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आढळून येणाऱ्या संशयिताची तातडीने करोना चाचणी करण्यात येत आहे.

दररोज ३०० ते ४०० नागरिकांच्या करोना चाचण्या होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्या व्यक्तीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी केली जात आहे. त्यासह, नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील ४३१ गावांपैकी ३५२ गावे करोनामुक्त झाली आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक ११२ गावांचा समावेश आहे.

सध्या उपचाराधीन रुग्ण ३२४

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत ३२४ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत. त्यामध्ये अंबरनाथ ५२, कल्याण ६४, भिवंडी ७६, शहापूर ६४ आणि मुरबाडमधील ६८ रुग्णांचा समावेश आहे.

तालुकानिहाय करोनामुक्त गावे

तालुका गावे

अंबरनाथ    २२

भिवंडी  ९४

कल्याण ३४

मुरबाड  ११२

शहापूर ९०

एकूण   ३५२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *