‘टोकाई’च्या सात उपोषणकर्त्यां कामगारांची प्रकृती गंभीर

वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर मागील चार दिवसांपासून १३ कामगारांचे ११ महिन्यांच्या थकीत देयकाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर बनली आहे. या संदर्भातील अहवाल शनिवारी आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाने दिला आहे.

टोकाई सहकारी साखर कारखाना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी ताब्यात घेतल्यानंतर पाच गळीत हंगाम पूर्ण केले. कारखान्यावर सुमारे चारशे कर्मचारी आहेत. त्यामध्ये कायमस्वरूपी १५० तर हंगामी रोजंदारीवरील २५० कामगार असून या कामगाराचे अकरा महिन्यांचे पगार बिल सुमारे २ कोटी ९७ लाख रुपये थकले आहेत. थकीत पगार बिल मिळावे अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा कामगारांनी ६ ऑगस्ट रोजीच्या लेखी निवेदनाद्वारे दिला होता. उपोषणार्थी १३ पैकी ७ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचा अहवाल शनिवारी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने लेखी दिला आहे. भुजंग खंदारे, मानेजी मोरतारे, तातेराव तरटे, शंकर अंभोरे, दुर्गादास अंभोरे, विजय मगर व संतोष पिठोरे या कामगारांचा प्रकृती गंभीर बनलेल्यांमध्ये समावेश आहे. तर इतर उपोषणार्थीमध्ये ई. बी. बर्वे, एम. सी. हजारे, व्ही. व्ही. कदम, आर. जी. गवारे, एस. पी. राठोड,  डी. के. कदम यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांचे एफआरपी पोटी सुमारे पाच कोटी,वाहतूकदारांचे सुमारे चार कोटी, कामगारांचे पगार बिलापोटी सुमारे तीन कोटी, पूर्णा साखर कारखान्याचे एक कोटी २० लाख रुपये, राज्य सहकारी बँकेचे पूर्वहंगामीकर्ज २ कोटी ४३ लाख रुपये, आधीच कर्जापोटी टोकाई कारखाना डबघाईला आलेला आहे. साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा संचालक मंडळाचा संकल्प आहे. त्याला कामगार व सभासद शेतक?ऱ्यांचा तीव्र विरोध आहे. दरम्यान, कामगाराच्या उपोषण स्थळाला वसमतचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू भैया नवघरे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेटी दिल्या.

कारखान्याच्या परिस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मालेगावकर म्हणाले, साखर कारखान्याकडे उत्पादन केलेली १ लाख १२ हजार क्विंटल साखर जमा आहे. मात्र या साखरेवर सुमारे तीस कोटींचे कर्ज असल्याचे सांगून कामगारांच्या पगार बिलासंदर्भात संचालक मंडळाची बैठक सुरू आहे.

दोन दिवसांत संचालक मंडळाने निर्णय न घेतल्यास साखर ताब्यात घेऊन तिची विक्री करून कामगाराचे देणे देऊ, असा इशारा माजी खासदार शिवाजी माने यांनी दिला आहे. शनिवारी दुपारी उपोषणस्थळी भेट दिली, तेव्हा ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *