गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांच्या कालबाह्य़ असलेल्या संकेतस्थळामध्ये अखेर ठाणे पोलिसांनी महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार आता हरविलेली कागदपत्रे, मोबाइल इत्यादी वस्तूंची तक्रार नागरिकांना थेट घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने एका क्लिकवर करता येणे शक्य होणार आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रातील नागरिकांना पोलीस ठाण्यांविषयी माहिती मिळावी, अधिकाऱ्यांना संपर्क करता यावा किंवा एखादी तक्रार नोंदविता यावी यासाठी ठाणे पोलिसांनी एक संकेतस्थळ तयार केले होते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या संकेतस्थळावर नागरिकांच्या मदतीसाठी केवळ पोलीस अधिकाऱ्यांची नावे, माहिती अधिकार, पोलीस भरतीविषयी माहिती आणि विविध उपक्रम उपलब्ध होते. त्याव्यतिरिक्त सर्व माहिती कालबाह्य़ आहे. तसेच संकेतस्थळ वापरण्यासही किचकट होते. त्यामुळे नागरिकांना अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक मिळविणे शक्य होत नव्हते. संकेतस्थळ अद्ययावत नसल्याने साधे ओळखपत्र गहाळ झाल्यासही नागरिकांना पोलीस ठाण्यात यावे लागत होते. वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता.
हे सर्व प्रकार टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी त्यांचे संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. त्यामध्ये हरविलेल्या किंवा सापडलेल्या वस्तूंची माहिती संकेतस्थळामध्ये नागरिकांना घरबसल्या भरता येणार आहे. तसेच हे संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध आहे. भाडेकरूंची माहितीही नागरिकांना ऑनलाइन जमा करता येणार आहे.
अंध व्यक्तींनाही फायदा
विशेष म्हणजे हे नवे संकेतस्थळ अंध व्यक्तींनाही त्यांच्या मोबाइलमध्ये आवाजाद्वारे हाताळता येऊ शकते. अंध व्यक्तींसाठीच्या मोबाइलमध्ये एक विशिष्ट सॉफ्टवेअर असते. अंध व्यक्तींनी ठाणे पोलिसांचे हे संकेतस्थळ मोबाइलमध्ये सुरू केल्यास त्यांना विविध पर्यायांचा आवाज येणार आहे. त्यामुळे आवाजाच्या माध्यमातून त्यांनाही एखादी तक्रार करणे शक्य होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.