जुन्या नाशकाची ओळख असलेल्या ‘सीताबाई मिसळ’च्या संचालिका सीताबाई दगूशेठ मोरे (वय ९५) यांचे अनसूया नगर, टाकळीरोड येथे निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत सीताबाई या कार्यरत होत्या. जुन्या नाशकात असलेले हॉटेल त्या स्वत: चालवायच्या. मिसळ तयार करण्यापासून ते साफसफाईपर्यंत सर्व कामे त्या स्वत: करायच्या. त्यांनी कधीही नोकरांच्या भरवशावर व्यवसाय केला नाही. दुसऱ्याच्या कामावर त्या अवलंबून नव्हत्या. त्याच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांनी मिसळची चव चाखली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
सीताबाईंच्या मिसळीची चव चाखण्यासाठी दूरवरून लोक येतात. त्यांच्याकडे मिळणारी शेवही तितकीच प्रसिद्ध आहे. कुठला कामगार हाताशी न घेता त्या या वयातदेखील स्वतःच गरम शेव काढण्याचे काम करीत होत्या. त्यांचा एक मुलगा महापालिकेत तर दुसरा नाशिक करन्सी प्रेसमध्ये कामाला तर सीताबाईंना पीएसआय जावई लाभलाय. नातू, पणतू झाले तरी तितक्याच हिरीरीनं त्यांचे काम त्या करीत होत्या. कितीही संकटे आली तरी अपार कष्ट आणि जिद्दीने त्यांच्यावर यशस्वीपणे मात करता येते हे सीताबाईंनी आपल्या मेहनतीने दाखवून दिले. हॉटेलमध्ये येणारा आमदार असो वा सामान्य नागरिक तितक्याच शिस्तीने त्या वागत होत्या.