ठाणे जिल्ह्य़ात ‘डेल्टा प्लस’चा शिरकाव

ठाणे जिल्ह्य़ात ‘डेल्टा प्लस’चा शिरकाव

करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने ठाणे जिल्ह्य़ातील निर्बंध नुकतेच शिथिल करण्यात आले असतानाच जिल्ह्य़ात करोना डेल्टा प्लसचे एकूण चार रुग्ण आढळून आल्याने धास्ती वाढली आहे. त्यापैकी तीन रुग्ण ठाणे शहरातील तर एक रुग्ण नवी मुंबईतील आहे. ठाणे शहरातील रुग्ण बरे झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसह त्यांच्या इमारतीमधील रहिवाशांच्या मंगळवारपासून चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. जिल्ह्य़ात दररोज २०० ते २५० रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्य़ात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १.७६ टक्के आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्य़ाची यंत्रणा सज्ज आहे, तसेच रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंधही नुकतेच शिथिल करण्यात आले आहे.

करोनाची परिस्थिती आटोक्यात असतानाच जिल्ह्य़ात डेल्टा प्लस’चा शिरकाव झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागांपाठोपाठ आता जिल्ह्य़ाची धास्ती वाढली आहे. जिल्ह्य़ात डेल्टा प्लसचे एकूण चार रुग्ण आढळले असून त्यापैकी तीन ठाणे शहरातील तर, एक नवी मुंबईतील आहे. या वृत्तास ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दुजोरा दिला आहे. या संदर्भात संबंधित महापालिकांना माहिती देण्यात आली असून त्यांना सतर्क राहण्याबरोबरच संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याबाबत कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहरात आढळून आलेल्या त्या दोन रुग्णांना करोनाची लागण झाली, त्यावेळेस त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. तसेच यापैकी एका रुग्णाने लशीचा पहिला डोस घेतलेला होता. या दोन्ही रुग्णांच्या नमुन्यामध्ये करोना डेल्टा प्लसचा विषाणू आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील तसेच त्यांच्या इमारतीतील रहिवाशांच्या मंगळवारपासून चाचण्या करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. वैयजंती देवगेकर यांनी दिली.

संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी ठाणे शहरात आढळून आलेल्या दोन रुग्णांना करोनाची लागण झाली, त्यावेळेस त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली होती. तसेच यापैकी एका रुग्णाने लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. या दोन्ही रुग्णांच्या नमुन्यामध्ये करोना डेल्टा प्लसचा विषाणू आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील तसेच त्यांच्या इमारतीतील रहिवाशांच्या मंगळवारपासून चाचण्या करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *