कर्नाटकातील विजयपुरा येथे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका मुस्लीम पित्याने त्याच्या मुलीचं वैदिक पद्धतीनं हिंदू तरुणाशी लग्न लावलं. मुस्लीम पित्याने एका अनाथ हिंदू मुलीचे संगोपन केले होते. मेहबूब मस्ली हे १८ वर्षीय हिंदू मुलगी पूजा वडिगेरीचे पालक आहेत. पूजाचे नुकतेच लग्न झाले आहे. मेहबूब मस्ली यांनी शुक्रवारी विधीनुसार पूजाचे एका हिंदू तरुणाशी लग्न लावले.
पूजा अनाथ होती आणि तिच्या नातेवाईकांनी तिचे संगोपन करण्यास नकार दिल्यानंतर मस्लीने वडिलांच्या रूपात तिची काळजी घेतली. मस्ली दोन मुली आणि दोन मुलांचा बाप असला तरी त्याने पूजाला घरी आणण्याचा निर्णय घेतला. “ती ज्या धर्माची आहे त्या व्यक्तीशी तिचे लग्न करण्याची माझी जबाबदारी होती,” असे मेहबूब मस्ली सांगतात.
मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडले नाही
“ती माझ्या घरामध्ये अधिक काळ राहिली पण मी तिला कधीच आमचा धर्म (इस्लाम) पाळण्यास किंवा मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडले नाही. हे आपल्या धर्माच्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे”, असे मेहबूब मस्ली यांनी सांगितले. तसेच वराच्या पालकांनी हुंडा न मागता आनंदाने पूजाला स्वीकारल्याचे मस्ली म्हणाले. त्यांनी लोकांना विविध समुदायांमध्ये सामंजस्याने राहण्याचे आवाहन केले आहे.
